‘बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी येणारे अधिकारी परत कसे जातात ते पाहातोच’, अशी भाषा वापरणारे भाजपचे आमदार रिवद्र चव्हाण यांच्याविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  
चव्हाण यांच्यासोबत सुरेश पवार यांच्याविरोधातही दंडसंहितेच्या १५३ कलमान्वये चिथावणी देणे, प्रक्षोभक भाषण करणे, याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेतील पालिकेच्या ‘ह’ प्रभागात अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई सुरू  होती. ही कारवाई रहिवाशांवर अन्याय करणारी आहे. रहिवाशांचे पुनर्वसन करा, अशी भूमिका घेत २९ एप्रिल रोजी आमदार चव्हाण तसेच त्यांच्या सर्वपक्षीय समर्थकांनी प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी  चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामाबाबत बातम्या प्रसिध्द करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या डोंबिवलीच्या प्रतिनिधीवर बेजबाबदार आरोप करून पालिका अधिकाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले होते. यासंदर्भात ह प्रभागाचे प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात मोर्चाचा सविस्तर अहवाल सीडीसह सादर केला होता. या सर्व कागदपत्रांची छाननी करून अखेर पोलिसांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Story img Loader