मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याच्या आरोपाखाली शीव पोलिसांनी दोन शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी शिवसेनेच्या आयटी सेलशी संबंधीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात सत्ता संघर्ष पेटला असताना आता हा वाद समाज माध्यमांपर्यंत पोहोचला आहे.
वरळीतील युवसेना शाखा अधिकारी व सोशल मीडिया शाखा समन्वयक रोहन पाटणकर व पुणे विभागाचे युवासेना आयटी शाखेचे प्रमुख नितीन शिंदे यांच्याविरोधात शीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गटांमध्य़े शत्रृत्त्व निर्माण करणे व एकोपा टिकवण्यास बाध निर्माण होईल अशी कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रोहन पाटणकर१९ या प्रोफाईलवरून संबंधित पोस्ट १ ऑगस्टला ट्वीट करण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री यांच्या चेहऱ्याचे विदृपीकरण करण्यात आले होते. तसेच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे याने या पोस्टला दुजोरा देऊन ते छायाचित्र पुन्हा ट्वीट केल्याचा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची प्रतिमा जनमानसात मलीन करण्यासाठी आरोपींनी हा प्रकार केल्याची तक्रार विजय पगारे यांनी केली असून त्यांच्या तक्रारीवरून अखेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.