मुंबई : एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, मुलुंड दंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जावेद अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.
तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी अख्तर यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला होता. त्यात, दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवल्याची आणि त्यामुळे अख्तर यांच्याविरोधात खटला चालवू इच्छित नाही, असे म्हटले होते. त्याची दखल घेऊन मुलुंड न्यायदंडाधिकारी एस. डी. चक्कर यांनी अख्तर यांची प्रकरणातून निर्दोष सुटका केली.
प्रकरण काय ?
तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे पडसाद उमटत असताना अख्तर यांनीही एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना यासंदर्भात मत व्यक्त केले होते. त्यावेळी, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती. संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे. संघ नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे, त्यांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचे अख्तर यांनी म्हटले होते. अख्तर यांच्या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप करून संघाचे कट्टर समर्थक वकील संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती. अख्तर यांनी राजकीय हेतूने संघाच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचेही दुबे यांनी तक्रारीत म्हटले होते.