मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) योजनेतील ३०५ घरांना नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या घरांसाठीच्या विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र वितरीत करण्याचा निर्णय मुंबई मंडळाच्या पणन विभागाने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून विजेत्यांना देकार पत्र वितरीत केले जाणार असून विजेत्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.
वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील ३०५ घरांच्या कामाला सुरुवात करत हे कामही पुनर्वसित इमारतीप्रमाणेच अर्धवट सोडून दिले. या अर्धवट अवस्थेतील घरांचा समावेश तत्कालीन म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी २०१६ सोडतीत केला. ही घरे सोडतीत समाविष्ट करण्यास विरोध असतानाही या घरांसाठी सोडत काढण्यात आली आणि त्याचा फटका या घरांच्या विजेत्यांना बसला. कारण या घरांचा ताबा मिळण्यासाठी विजेत्यांना तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अर्धवट घरांचे काम मुंबई मंडळाने पूर्ण करून नुकतीच घरांसाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने आता विजेत्यांना प्रत्यक्ष घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा – अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाण यांचे उच्च न्यायालयात आव्हान
हेही वाचा – मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला
पत्राचाळीतील विजेत्यांची पात्रता आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ३०५ पैकी अंदाजे ३०२ पात्र विजेत्यांना मंगळवारपासून तात्पुरते देकार पत्र वितरीत केले जाणार आहे. देकार पत्र मिळाल्यानंतर घराची रक्कम भरत पुढील प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना घराची चावी दिली जाणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्याने दिली. एकूण या विजेत्यांची आठ वर्षांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर आता संपल्याने ही बाब त्यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक मानली जात आहे.