‘स्मार्ट सिटी’च्या अभ्यासासाठी इस्त्रायलला जाणाऱ्या पथकामध्ये समावेश
राज्यातील प्रस्तावित स्मार्ट सिटींची सुयोग्य उभारणी व्हावी यासाठी इस्रायलमधील स्मार्ट सिटींचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकात चक्क स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या अधिकाऱ्याचीच रवानगी झाल्याचे उघडकीस आले आहे. पुढील महिन्यात हा अधिकारी स्वेच्छेने निवृत्त होणार आहे.
सन २०१४ सालचे जगातील स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळालेल्या इस्रायलमधील ‘नॉनस्टॉप सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेल अवीव-याफो या स्मार्ट सिटीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर याच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक पाठविले आहे.
या पथकात मुख्यमंत्र्यांचे सचिव तसेच पुणे, नागपूर, सोलापूर, महापालिकांचे आयुक्त आणि एमएमआरडीएच्या दळणवळण विभागाचे प्रमुख पी.के.आर. मूर्ती यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पथकात स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या पालिकाच्या आयुक्तांची निवड स्वाभाविक असली तरी मूर्ती यांची निवड चर्चेचा विषय ठरली आहे.
मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वीच ‘एमएमआरडीए’तून स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांचा राजीनामा महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंजूरही केला आहे. येत्या ६ ऑक्टोबरपासून मूर्ती यांचा एमएमआरडीएतील कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची स्मार्ट सीसीच्या अभ्यास दौऱ्यात निवड करण्यामागचे गुपित काय, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे नगरविकास आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि मूर्ती यांच्या दौऱ्यांच्या खर्चाचा भारही एमएमआरडीएवरच टाकण्यात आला आहे. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Story img Loader