मरिन ड्राइव्हऐवजी उद्यानामध्ये खुली जिम उभारण्याच्या दस्तुरखुद्द आयुक्तांच्या आदेशास पालिका अधिकाऱ्यांनीच हरताळ फासला आणि मरिन ड्राइव्ह येथे दोन जिम उभारण्यास परवानगी दिली. पण शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील जिम संबंधित कंपनीने परवानगी क्षेत्राबाहेर उभारल्याने पालिकेने त्यावर गुरुवारी कारवाई केली. सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन, तसेच फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे राजकारण्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि शिवसेनेकडून आलेला दबाव यामुळे पालिका आयुक्तांनी जिम पुन्हा त्याच ठिकाणी उभारण्याची सूचना करीत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
मुंबईकरांना सुदृढ आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी खुल्या जिम उभारण्याची कल्पना अभिनेता दिनो मोरिया याने मांडली होती. आदित्य ठाकरे यांना ती भावल्याने त्यांनी जिमसाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारे डी. एम. फिटनेस कंपनीने गेल्या आठवडय़ात मरिन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर दोन ठिकाणी जिम उभारल्या. पण आयत्या वेळी जागा बदलून एका जिम पोलीस मैदानासमोर उभारण्यात आली. ‘सी’ विभाग कार्यालयाची परवानगी न घेताच उभारलेल्या या जिमवर पालिकेने कारवाई केली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजय मेहता यांना घेराव घातला. परवानगी घेतलेली असतानाही जिम काढून टाकल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, पांडुरंग सकपाळ यांनी आयुक्तांना जाब विचारला. शिवसेनेकडून दबाव वाढू लागल्याने काढून टाकण्यात आलेली जिम पुन्हा त्याच ठिकाणी उभारण्याची सूचना आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चौकशीचा अहवाल मिळेपर्यंत जिम आहे त्याच ठिकाणी ठेवावी, असेही अजय मेहता यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मरिन ड्राइव्ह येथे डी. एम. फिटनेसतर्फे उभारण्यात येणाऱ्या जिमबाबत अतिरिक्त आयुक्तांनी अहवाल २ जुलै २०१५ रोजी अजय मेहता यांना सादर केला होता. मरिन ड्राइव्हऐवजी ‘ए’ विभागातील उद्यानांमध्ये जिम उभारावी, असे अहवालात म्हटले होते. त्याच्याशी सहमती दर्शवून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविलेही होते. मात्र ‘ए’ विभाग कार्यालयाने १४ जुलै २०१५ रोजी आपल्या हद्दीतील मरिन ड्राइव्ह परिसरात दोन जिम उभारण्यास परवानगी दिली. ही परवानगी मिळताच डी. एम. फिटनेसने नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर दोन जिम उभारल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा