मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारा
मुंबई महानगरपालिकेने सांडपाणी वहन आणि नाल्यातील गाळ उपसण्याचे काम कंत्राटदारांना दिले असून संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत का याची पाहणी करण्याची जबाबदारी विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सफाई कार्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपकरणांपासून वंचित ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारांबरोबरच अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा >>> हॉटेलच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून ग्राहकांची फसवणूक; बनावट संकेतस्थळांच्या संख्येत ३०४ टक्क्यांनी वाढ
मुंबईमधील सांडपाणी वहन आणि नाल्यातील गाळ काढण्याच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. सफाई कामगारांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून कंत्राटात नमुद अटी व शर्तीनुसार आवश्यक ती सुरक्षा साधने दिली आहेत की नाही याची कंत्राटदाराने खातरजमा करणे अपेक्षित आहे. यामध्ये उणीवा आढळल्यास संबंधित कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कंत्राटदाराने सफाई कामगारांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध केली आहेत का, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहे का याची खातरजमा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेट द्यावी. अटी-शर्तीची पूर्तता करण्यात आली नसल्यास कंत्राटदाराकडून पूर्तता करून घ्यावी. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.