सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर सक्तीची समाजसेवा आणि आर्थिक दंडाची कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक समिती तयार करण्यात आली असून, ही समिती थुंकणाऱ्यांविरोधातील कारवाईचे स्वरूप ठरवेल. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतील, याबाबतही समिती निर्णय घेईल. थुंकणाऱ्या लोकांच्या अहंकाराला ठेच लागेल किंवा त्यांना लाज वाटेल, अशी शिक्षा अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. अनेकदा याप्रकरणात आर्थिक दंडाची शिक्षा पुरेशी नसते. कारण, गुन्हा करणारे अनेकजण दंडाची रक्कम भरतात आणि ती घटना विसरून जातात. काही दिवसांनी ते पुन्हा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कृत्य करतात. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही कायद्यात सक्तीच्या समाजसेवेच्या शिक्षेची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही दीपक सावंत यांनी सांगितले. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती थुंकताना आढळल्यास त्यालाच ती जागा साफ करण्यास सांगण्यात येईल. अशाप्रकारची शिक्षा थुंकणाऱ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील, असे मत दीपक सावंत यांनी व्यक्त केले. याशिवाय, आर्थिक दंडाच्या रकमेतदेखील वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी थुंकताना पकडल्यास पहिल्यावेळी १००० रूपयांचा आर्थिक दंड आणि एक दिवसाच्या सामाजिक सेवेची शिक्षा करण्यात येईल. दुसऱ्यांदा हा गुन्हा करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला ३००० रूपये आणि तीन दिवसांची सक्तीच्या समाजसेवेची शिक्षा करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्यांदा थुंकताना आढळल्यास त्या व्यक्तीला ५००० रूपये आणि पाच दिवसांच्या सक्तीच्या समाजसेवेची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सावंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oh spit stricter rules against spitting in public places says mumbai public health minister
Show comments