मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं मध्य रेल्वेकडून ट्विटरवर स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी रेल्वेचे कर्मचारी काम करत असून लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम दुपारी १.५० वाजता पूर्ण करण्यात आलं आणि सीएएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल हळूहळू सुरू करण्यात आल्या. मात्र वेळापत्रक विस्कळीत झाल्याने दादरपासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या रांगा दिसून येत आहेत.
नेमकं झालं काय?
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलची सेवा बंद पडली. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परेल, दादरपासून सीएसएमटीपर्यंत लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. परिणामी प्रवाशांना रुळावरून पायी जाऊन जवळचे स्थानक गाठावे लागल्यचं चित्र दिसून आलं.
सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर हा बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील सर्व धीम्या गतीच्या लोकल जलद गतीच्या मार्गावरून धावत आहेत. त्यामुळे त्या उशीराने धावत असल्याचंही मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, सीएसटीकडे जाणाऱ्या काही धीम्या लोकल दादर, कुर्ला, परेलपर्यंतच चालवण्यात येत आहेत.
दरम्यान, सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल पुढे जात नसल्याने सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलचे वेळापत्रकही विस्कळीत झालं. कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या काही लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या.