‘ऑनलाइन’च्या पर्यायांमुळे ग्राहकांची पसंती

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे अनेक दैनंदिन व्यवहारांवर र्निबध आले असताना, अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची प्रवासीसुविधा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘ऑनलाइन’ अथवा कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा असल्यामुळे ओला, उबर यांसारख्या टॅक्सींनी प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या आठ दिवसांत वाढली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संख्येवर अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवेमुळे असाही परिणाम झाला आहे. त्यात ऑनलाइन बुकिंगच्या पर्यायामुळे प्रवासासाठी ओला, उबर निवडणे प्रवाशांना सोयीचे वाटते आहे. त्यांच्याकडे एरवी रोखीने भाडे चुकते करणाऱ्यांची संख्याही त्यामुळे कमी झाली आहे. रोखीने पसे देण्यापेक्षा ‘पेटीएम’सारख्या अ‍ॅपद्वारे पसे चुकते करताना प्रवासी दिसत आहे. ओला, उबर यांसारख्या वाहन व्यवस्था ‘पेटीएम’मार्फत प्रवासखर्च भागविण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. यात प्रवाशांना स्वत:जवळील क्रेडिट कार्ड क्रमांक ‘पेटीएम’ला द्यावा लागतो आणि आपल्या खात्यातून पसे कापून ‘पेटीएम’ झालेला प्रवासखर्च भरतो. त्यामुळे सुटय़ा पशांच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रवासी ओला, उबरच्या प्रवासासाठी ‘पेटीएम’च्या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत.

‘आमच्याकडे शंभर-पन्नास रुपयांचा तुटवडा आहे. नेहमीच्या टॅक्सीने प्रवास करणे म्हणजे स्वत:कडील मोड संपवण्यासारखे आहे. त्यामुळे सध्या मी ओला-उबर यांसारख्या पर्यायी वाहन व्यवस्थेने प्रवास करते आहे. यामध्ये प्रवास खर्च ‘पेटीएम’ खात्यातून भागतो,’ असे सीमा टोळे यांनी सांगितले. तर अँटॉप हिल विभागात राहणारे चंद्रकांत पडय़ाल यांची दोन वाहने ओला, उबरसाठी काम करतात. चलनटंचाईमुळे प्रवासखर्च देण्यासाठी रोखीने केले जाणारे व्यवहार थंडावले असून ९० टक्के व्यवहार ‘पेटीएम’ मार्फत होत आल्याचे पडय़ाल यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना सांगितले.

 

रिक्षा, टॅक्सी रस्त्यावरून गायब

ग्राहकांकडे सुटय़ा पैशांची चणचण, इंधन भरण्यासाठीही चलनदुष्काळ

मुंबई : चलनातील ५००-१००० रुपयांच्या नोटा हद्दपार झाल्यापाठोपाठ आता मुंबईच्या रस्त्यांवरून रिक्षा आणि टॅक्सीही हद्दपार झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. ग्राहकांकडे असलेली सुटय़ा नोटांची चणचण आणि इंधन भरण्यासाठी सुटय़ा पैशांचा अभाव यामुळे बहुतांश रिक्षा-टॅक्सीचालकांनी काही दिवस धंद्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिती बदलण्यास आणखी २० दिवस जाण्याची शक्यता रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेल्या रिक्षाचालकांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

रिक्षा व टॅक्सीमध्ये जवळपास दर दिवशी सीएनजी भरावा लागतो. त्यासाठी पेट्रोलपंपावर रांगा लावण्यापासूनच्या अडचणींना सध्या या चालकांना सामोरे जावे लागत आहे. रिक्षामध्ये १५० ते २०० रुपयांचा, तर टॅक्सीमध्ये ६०० ते ७०० रुपयांचा सीएनजी भरला जातो. अनेक रिक्षा-टॅक्सीचालक ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटा घेऊन गेल्यानंतर पेट्रोलपंपावरून त्यांना सुटे पैसे देण्यात अनेकदा खळखळ केली जात आहे. अनेक पेट्रोलपंपचालक सुटय़ा पैशांच्या अभावी ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे टॅक्सीमेन्स युनियनचे सचिव एल. क्वाड्रोस यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, प्रवासी जवळच्या भाडय़ासाठी ५०० रुपयांची नोट देण्याचे प्रकार घडत असल्याचे मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. रिक्षाचालक एखाद्या प्रवाशाला सुटे पैसे देऊ शकतो. प्रत्येक प्रवाशाला सुटे पैसे देणे शक्य नाही. अशा वेळी प्रवाशांशी बाचाबाची होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी आपला धंदा बंद ठेवला आहे. त्याशिवाय अनेक रिक्षाचालक आपल्याकडील ५००-१०००च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर रांगेत उभे आहेत, असेही राव यांनी स्पष्ट केले. या निर्णयानंतर पहिले तीन-चार दिवस ५० टक्के रिक्षा रस्त्यांवर उतरल्या नव्हत्या. आता हा आकडा २५ ते ३० टक्के एवढा आहे, असेही त्यांनी सांगितले. टोलनाक्यांवरील वसुली बंद करण्यात आल्याने मुंबईकडे येणारी तसेच शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक सुसाट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, रस्त्यावरील रिक्षा-टॅक्सींचे घटते प्रमाण हे त्यामागील आणखी महत्त्वाचे कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रिक्षा, टॅक्सींची वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी कमी होण्यातही झाला आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांना सुटे पैसे देण्याऐवजी कॅश मेमोसदृश काही सोय करता येईल का, याबाबत पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशनशी चर्चा झाली आहे. चालकाने १५० रुपयांच्या गॅससाठी ५०० रुपयांची नोट दिल्यावर त्याला ३५० रुपये शिल्लक असल्याची पावती मिळेल. ही पावती दाखवून तो दुसऱ्या दिवशीही गॅस भरू शकेल. अशी सोय झाल्यास अनेक अडचणी कमी होतील.  – एल. क्वाड्रोस, सरचिटणीस (मुंबई टॅक्सीमेन्स युनियन)

Story img Loader