मुंबई : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक-मालकांनी मंगळवारपासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. जादा भाडय़ामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. त्यामुळे नियमितपणे ही सुविधा घेणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले. चालक-मालकांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी बैठक होणार असून त्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या अखत्यारीत ओला-उबरचे आंदोलन केले जात आहे. सोमवारी उबरच्या कुर्ला येथील कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतरही काही दाद न मिळाल्याने मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओला-उबरची बहुतांश सेवा मुंबई, नवी मुंबई, ठाणे व परिसरात बंदच राहिली. पाच ते सात मिनिटांत उपलब्ध होणाऱ्या गाडय़ा वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ उपलब्ध होत नव्हत्या. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी मंगळवारीही संप सुरूच राहिल्याचे सांगितले. संप मागे घ्या, अशी विनंती करणारे पत्र काही चालक-मालकांना कंपनीकडून आले.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कुर्ला येथील उबरचे कार्यालय मंगळवारीही बंद ठेवण्यात आले होते. संप हा दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. प्रवाशांचे हाल होऊ नये आणि त्यांना त्वरित गाडय़ा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे संपात सामील होण्यासाठी चालकांवर दबाव टाकला जात आहे. -उबर प्रवक्ता