रवी राणा आणि नवनीत राणा हे राणा दांपत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं समजल्यापासून शिवसेना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दांपत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर आज सकाळपासूनच नवनीत राणा यांच्या निवासस्थानाबाहेर आणि मातोश्रीबाहेर देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये एक ९२ वर्षांच्या आजीबाई देखील सहभागी झाल्या होत्या. राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी करताना आजीबाईंनी थेट ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे”

चंद्रभागा असं त्यांचं नाव असून या आजीबाईंचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालच आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

“तुम्हाला खरं सांगू का? माझ्या…”, राणा दांपत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

“आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार नाही का? साहेबांसाठी आम्ही झटणार. तिला (नवनीत राणा) वाटतं दोघंजण येऊ आणि गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच”, असं आजीबाई म्हणाल्या आहेत.

खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनीच मातोश्रीवर बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की…”!

आजीबाईंना उद्धव ठाकरेंचा फोन!

दरम्यान, चंद्रभागा आजींचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीमधून त्यांना फोन करून बोलावून घेतलं. यावेळी फोनवर देखील चंद्रभागा आजींनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासाठी आम्ही इथं बसलो असल्याचं सांगितलं. “उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काळजी घ्या. फार वेळ बसू नका. चहापाणी झालं. मी म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, तुमच्यासाठी आम्ही इथे बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. मातोश्रीवर तुम्हाला कुणी काही बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही”, असं उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितल्याचं चंद्रभागा आजीनं सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old age lady shivsena worker pushpa style dialogue uddhav thackeray phone pmw