मुंबई : बोरिवली पूर्व येथे गुरुवारी शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. दहिसर पोलिसांनी बसचालकाला अटक केली.
बोरिवली पूर्व परिसरात वास्तव्याला असलेले ७१ वर्षीय मोहन मलिक गेल्या पाच वर्षांपासून एका सुरक्षा कंपनीत काम करीत होते. दररोज सकाळी ७ च्या सुमारास ते कामावरून पायी घरी जायचे. सकाळी ८ च्या सुमारास त्याच्या नातेवाईकांना एक दूरध्वनी आला. त्यात त्यांना एका शाळेच्या बसने धडक दिल्याचे सांगितले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना कांदिवली येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
हेही वाचा – मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
हेही वाचा – अंधेरीमधील महापालिका शाळेत मतदानाविषयी जनजागृती
पोलीस तपासानुसार सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक अशोकवन परिसरात पोहोचले. तेव्हा शाळेच्या बसने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. बसचालक अरविंद कापसे याने त्यांना रुग्णालयात नेले. पोलिसांनाही कळवण्यात आले. कापसे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेऊन बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
© The Indian Express (P) Ltd