पार्किंगच्या जागेच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियरसोबत गेले वर्षभर न्यायालयीन लढा देणाऱ्या ८० वर्षांच्या निवृत्त सेनाधिकाऱ्याचा शुक्रवारी न्यायालयातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.
इंदर दुग्गल हे निवृत्त आणि वयोवृद्ध जवान पुण्याच्या कोंडवा येथील सैनिक वसाहतीत राहत होते. त्यांचे शेजारी निवृत्त ब्रिगेडियर असीलसिंग यांच्याशी त्यांचा घरासमोरील जागेमध्ये गाडय़ा उभ्या करण्यावरून बरीच वर्षे वाद होता. २००८ मध्ये हा वाद न्यायालयात पोहोचला. एवढी वर्षे सुरू असलेला वाद या वर्षी उच्च न्यायालयात आला. दुग्गल यांच्याविरुद्ध सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्यासमोर सुनावणी होणार होती. त्यांचे प्रकरण ५९ व्या क्रमांकावर होते. तरीही दोघेही न्यायालयात हजर होते. न्यायालयाचे कामकाज सुरू होऊन १५ मिनिटे होत आली असतानाच खुर्चीवर बसलेले दुग्गल अचानक जमिनीवर कोसळले. न्यायालयात हजर असलेल्यांनी तात्काळ त्यांना सावरण्याचा प्रयत्न करून खुर्चीवर बसविले. त्यांच्या खिशातील एक गोळीही त्यांना भरविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुग्गल काहीच हालचाल करीत नव्हते. अखेर न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी खुर्चीसहच दुग्गल यांनी न्यायालयाबाहेर आणून गोकुळदास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ज्यांच्यामुळे दुग्गल यांना या वयात न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या, त्या ब्रिगेडियर सिंग यांनीच दुग्गल यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा