मुंबई : विविध मुद्दे उपस्थित करीत विद्यार्थी व शिक्षक संघटनांच्या सदस्यांनी केलेल्या आंदोलनाच्या गदारोळानंतरही अधिसभेच्या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीचा ९६८ कोटी १८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी मंजूर झाला. मात्र, या अर्थसंकल्पावर विविध जुने उपक्रम आणि योजनांचीची छाप असून केवळ नव्याने तरतूद करण्यात आली आहे. तर अर्थसंकल्पामध्ये १४७ कोटी ६३ लाख रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात शनिवार, २२ मार्च रोजी पार पडली. मुंबई विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए. हर्षल वाघ यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या सदस्यांसमोर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मंजूर करण्यात आला. तसेच या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल, २०२२-२३ चे वार्षिक लेखे आणि ३१ मार्च २०२३ चा ताळेबंद व लेखापरीक्षण अहवालही मंजूर करण्यात आला.

प्रशासकीय उपक्रमांसाठी ७५ कोटींची तरतूद

वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पामध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीचे बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ व औद्याोगिक साहचर्य उपक्रम, शैक्षणिक आणि उत्कृष्टता प्रशासकीय उपक्रमांसाठी एकूण ७५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन आणि सभागृह, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारत दुसरा टप्पा, अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह दुसरा टप्पा, मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ले येथील सागरी अध्ययन केंद्र आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह अशा अनुषंगिक विकासकामांना प्राधान्य देत एकूण १३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Story img Loader