महत्त्वाची कामे पूर्ण होऊनही जलतरणपटूंसाठी दारे बंदच
सुरक्षेच्या कारणामुळे २००७ साली बंद करण्यात आलेल्या चेंबूरमधील महापालिकेच्या जलतरण तलावाचे बांधकाम तब्बल ११ वर्षांनी पूर्ण झाले असले तरी सर्वसामान्यांना तलाव खुला होण्याकरिता वाट पाहावी लागणार आहे. २००७ पासून हा तलाव बंद आहे. पालिकेने ऑलिम्पिक दर्जाच्या या तलावाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र किडुकमिडुक कामामुळे तलाव पूर्णपणे बांधूनही तो सुरू करता येत नाही. त्यामुळे तलावाचे उरलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि तो खुला करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयालगत १९९२ साली हा तलाव बांधण्यात आला. मात्र, पालिकेकडून तलावाची योग्य देखभाल न झाल्याने काही वर्षांतच या तलावाची दुर्दशा झाली. एखादा अपघात घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने २००७ साली हा तलाव सर्वसामान्यांसाठी बंद केला. त्यानंतर अनेक वर्षे हा तलाव बंदच होता. या ठिकाणी चांगल्या दर्जाचा तलाव पालिकेने बांधावा, अशी मागणी राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांकडून करण्यात येत होती. मात्र पालिकेने त्याकडे कित्येक वर्षे लक्षच दिले नाही. या तलावासाठी अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आली. अखेर पालिकेने तलावासाठी निधी मंजूर करत २०१५ला नव्याने बांधकाम सुरू केले.
तलावाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने १८ महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र कंत्राटदाराने हे बांधकाम पूर्ण करण्यास सव्वा तीन वर्षांचा अवधी घेतला. अद्यापही हा तलाव खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. पालिकेने तलाव तात्काळ सुरू करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित खात्याकडे चौकशी केली असता, तलावाच्या बाजूला कपडे बदलण्याच्या खोल्यांचे काम अद्यापही बाकी असल्याचे सांगण्यात आले. ते काम पूर्ण होताच तलाव सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.
लहानमोठय़ांसाठी स्वतंत्र व्यवस्था
ऑलिम्पिकच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या तलावामध्ये एक मोठा आणि एक लहान असे दोन भाग आहेत. यामधील मोठय़ा तलावाची क्षमता २८ लाख लिटर असून लहान तलावाची क्षमता १० लाख लिटर इतकी आहे. तलाव बंद होण्याआधी एक हजाराहून अधिक व्यक्ती त्याच्या सदस्य होत्या. नव्या तलावाच्या ठिकाणी सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त सदस्य नोंदणी होण्याची अपेक्षा आहे.