उस्मानाबाद शहरातील पाणीप्रश्नावरून थेट राजदंड उचलणारे शिवसेना आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना मंगळवारी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. मात्र ही शिक्षा खूप मोठी असल्याने ती कमी करावी, अशी मागणी करीत विरोधकांनी सभागृहातच धरणे धरले.
उस्मानाबादमधील भीषण पाणीटंचाईबाबत ओमराजे निंबाळकर यांनी विचारलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. शहराला सध्या ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. मात्र या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांमार्फत चौकशी करून दोषींविरोधात फौजदारी कारवाई केली जाईल, अशी घोषणा ढोबळे यांनी केली. तेव्हा समाधान न झाल्याने ओमराजे यांनी थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ धाव घेत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी निंबाळकर यांना वर्षभरासाठी निलंबित केल्याची घोषणा केली. मात्र निलंबनाचा काळ कमी करावा, अशी मागणी करीत विरोधी सदस्यांनी सभागृहातच धरणे धरले. त्यावरून दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om raje nimbalkar suspended for one year
Show comments