लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित होणारा ‘ओह माय गॉड ‘ चित्रपटाचा दुसरा भाग सेन्सॉरच्या कात्रीत सापडला होता. लैंगिक शिक्षणाचे महत्त्व समजावून देणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेतील बदल आणि अन्य ३५ दृश्ये वगळण्याची मागणी सेन्सॉर बोर्डाने केली होती. याविरोधात बोर्डाकडे फेरविचाराची मागणी करणाऱ्या निर्मात्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. कुठलीही काटछाट न करता प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला प्रौढांसाठीचा चित्रपट या प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले आहे.
‘ओह माय गॉड – २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्याआधी या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला होता. हा टीझर पाहिल्यानंतर महाकाळेश्वर मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनी मंदिरात चित्रित झालेली काही दृश्ये वगळण्यात यावी अशी मागणी केली होती. याशिवाय, अक्षय कुमारला देवाच्या भूमिकेत न दाखवता देवदूताच्या भूमिकेत दाखवण्यात यावे अशीही मागणी लोकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील जवळपास ३५ दृश्यांची काटछाट करण्याची सूचना केली होती. शिवाय, चित्रपटाला प्रौढांसाठीचा चित्रपट असे प्रमाणपत्र देण्यात आले होते. याविरोधात चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे दाद मागितली. अखेर या चित्रपटाचे फेरपरीक्षण करण्यात आले.
फेरपरीक्षण समितीने चित्रपटातील कोणतेही दृश्य काढून टाकण्याची मागणी केली नाही. मात्र चित्रपटात २५ बदल सुचवण्यात आले असून प्रौढांसाठीचा चित्रपट हे प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे. आजच्या काळात शालेय वयात लैंगिक शिक्षण देणे गरजेचे झाले आहे. या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट सगळ्या वयोगटातील लोकांनी पाहायला हवा. त्यामुळे प्रमाणपत्रात बदल केला जावा असे निर्मात्यांचे म्हणणे होते. मात्र प्रदर्शनासाठी हातात कमी कालावधी राहिला आहे आणि काटछाटही मोठ्या प्रमाणात करावी लागली असती. त्यामुळे प्रौढांसाठीचा चित्रपट या प्रमाणपत्रासह पुढे जाण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.