मुंबई : मालाडमधील प्राण्यांच्या दहनवाहिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या पीएनजीच्या खर्चात बचत झाल्याने पालिकेवरील आर्थिक ताण काही अंशी कमी झाला आहे. पूर्वी दहनवाहिनीसाठी प्रतिमहिना लागणाऱ्या नैसर्गिक वायूसाठी पालिकेला एक ते सव्वा लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने दहनविधीसाठी दोन वेळा निश्चित केल्या. त्यांनतर नैसर्गिक वायूसाठी येणारा खर्च ४०-४५ हजार रुपयांवर आला आहे.
पालिकेचे पशुवैद्याकीय आरोग्य खाते आणि ‘पी’ उत्तर विभाग कार्यालय यांनी मिळून मालाड येथील एव्हरशाइन नगरात १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्राण्यांसाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली. मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने दहन करावे, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात होती. त्यानुसार पालिकेने दहनवाहिनीसाठी नैसर्गिक वायूचा वापर सुरू केला. विनाशुल्क या ठिकाणी मोफत दहनविधी सेवा पुरविली जाते. या दहनवाहिनीची ५० किलोची क्षमता असून एकाच वेळी १० ते १२ किलोच्या पाच प्राण्यांवर दहनविधी करणे शक्य आहे. सुरुवातीला सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत प्राण्यांवर दहनविधी केले जात होते. दहनविधीपूर्वी १ ते दीड तास यंत्रणा सुरू ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे दहनासाठी कुठल्याही क्षणी प्राणी आणले जाण्याची शक्यता असल्याने दिवसभर संबंधित यंत्रणा सुरू ठेवली जात होती. मात्र, महिन्यानंतर नैसर्गिक वायूपोटी सुमारे १ लाख रुपये खर्च आला.
हेही वाचा…दालन, बंगले वाटपावरून धुसफूस
मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी दिवसातून केवळ दोन वेळा प्राण्यांवर दहनविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहनविधीसाठी दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ४ ते ६ ही वेळ निश्चित करण्यास आली. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणीनंतर खर्चात मोठी बचत झाल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा…मंत्रालयातील सहावा मजला अभ्यागतांसाठी बंद?
दहनवाहिनी पुन्हा सुरू
महानगरपालिकेतर्फे मालाड येथील प्राण्यांची दहनवाहिनी देखभालीच्या कामांसाठी २ डिसेंबरपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र, देखभालीची सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे आता प्राण्यांची दहनवाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, रेशनकार्ड यापैकी एक आणि पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना, वीज देयक, पाणी देयक यापैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्राणिप्रेमी असल्यास भारतीय जीवजंतू मंडळाने दिलेले कोणतेही एक ओळखपत्र सादर करून मृत प्राण्यांवर दहनविधी करता येतात.