सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना पायदळी तुडवून सोमवारी दहीहंडीच्या उत्सवात मुजोरीचे थर रचले गेले! समाजाच्या प्रत्येक स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही स्वत:च्याच गुर्मीत मश्गूल असलेले दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांनी बालगोविंदांच्या सहभागावर आणलेली बंदी, ध्वनिमर्यादेचे बंधन, सुरक्षायोजना राबवण्याच्या सूचना सोमवारी अक्षरश: धाब्यावर बसवल्या. याचा परिणामही व्हायचा तोच झाला आणि सोमवारी दिवसभरात मुंबई-ठाण्यात मिळून तब्बल तीनशेहून अधिक गोविंदा जखमी झाले. एका गोविंदा पथकातील ४६ वर्षीय सदस्याचा ठाण्यात चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटनाही याच अविवेकाचे द्योतक ठरली. पण एवढे सगळे होत असतानाही अनेक ठिकाणी आयोजक राजकारणी उत्सव शांततेत पार पडल्याच्या बढाया मारताना दिसत होते. तर न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तडक कारवाई करण्याची ग्वाही देणारी पोलीस यंत्रणाही ढिम्मच राहिली.

जखमी गोविंदा अडीचशेवर..
दहीहंडी उत्सवात थर लावताना जखमी झालेल्या २३४ गोविंदांना उपचारांसाठी महानगरपालिका, सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी २०८ जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. तर २६ गोविंदा उपचार घेत आहे, अशी माहिती महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.  शीव रुग्णालयात दाखल असलेल्या एका गोविंदाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ठाणे शहरात २९ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी सात गोविंदाना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तर चार ते पाच गोविंदांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

४६ वर्षीय गोविंदाचा मृत्यू
ठाणे :  मुंबईतून दहीहंडी फोडण्यासाठी ठाण्यात आलेल्या एका गोविंदा पथकातील सदस्याचा सोमवारी उत्सवादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र धोंडू आंबेकर (४६) असे त्यांचे नाव आहे. लालबाग येथील साई सदन गोविंदा पथकासोबत आंबेकर हे ठाण्यात आले होते. मात्र, तेथे खूप गर्दी असल्याने त्यांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी आंबेकर आपल्या मित्रांसोबत ट्रकची वाट पहात उभे असतानाच चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, थर रचणाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता, असा दावा या गोविंदा पथकातील सदस्यांनी केला आहे.