मुंबई : उन्हाळ्यात प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १४ अतिरिक्त वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्या चालविण्याबाबत नियोजन सुरू आहे. नव्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या सामान्य उपनगरी रेल्वेगाड्यांच्या वेळेत चालवण्यात येतील. वातानुकूलित रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांचे अतिरिक्त दराचे तिकीट खरेदी करूनही सामान्य रेल्वेगाड्यासारखाच अडचणींचा प्रवास होत होता. त्यामुळे वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरूळ-उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे १,८१० उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या होतात. यापैकी ६६ वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या मुख्य मार्गावर चालवल्या जात आहेत. तर, येत्या काही दिवसांत मुख्य मार्गावर आणखी १४ वातानुकूलित रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी वातानुकूलित गाड्या चालवल्या जातील. शिवाय दुपारीही वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे.
कडक उन्हाळ्यात वातानुकूलित रेल्वेगाड्यांमधून प्रवास करण्यास प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याबाबत नियोजन सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी ‘एसी लोकल टास्क फोर्स’ने प्रवाशांना तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे.
थेट तक्रार शक्य
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने २५ मे रोजी वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी ‘एसी टास्क फोर्स’ स्थापन केला असून प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
तक्रारींचे जलद निवारण
मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. प्रवासी वारंवार स्थानक व्यवस्थापक किंवा समाज माध्यमावर याबाबत तक्रार करीत असतात. मात्र, विनातिकीट प्रवाशांना त्वरित रोखणे कठीण होते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी ‘एसी लोकल टास्क फोर्स’ने प्रवाशांना तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे. व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून या क्रमाकांवर तक्रार केल्यास एक – दोन दिवसांत तक्रारींचा पाठपुरावा करून निराकरण करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने १०० टक्के तक्रारींचे निवारण केले आहे.