मुंबई : वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर बुधवारपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव १४ वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार असल्याने आठवड्याच्या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरून ८० होणार आहे. तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरूळ-उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. त्यात कोणतीही वाढ केली नाही. परंतु, १४ सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहे. या वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत धावतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल धावेल.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलच्या ६ गाड्या होत्या. त्यापैकी ५ गाड्या धावत होत्या. तर, एका गाडीची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी सातवी गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली. त्यानंतर, तिची देखभाल-दुरूस्ती व इतर तपासणी, चाचण्या करून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात ७ गाड्या असून त्यापैकी ६ गाड्या धावणार आहेत.
नवीन वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक
अप दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)
- सकाळी ७.३४ वाजता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सकाळी १०.४२ वाजता बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- दुपारी १.२८ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- दुपारी ३.३६ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सायंकाळी ५.४१ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सायंकाळी ७.४९ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- रात्री ११.०४ वाजता बदलापूर ते ठाणे
डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)
- सकाळी ६.२६ वाजता विद्याविहार ते कल्याण
- सकाळी ९.०९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर
- दुपारी १२.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
- दुपारी २.२९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
- दुपारी ४.३८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
- सायंकाळी ६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
- रात्री ९.०८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर