मुंबई: मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी होती. मात्र रविवार, १४ जानेवारी रोजी सुट्टी असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात पतंग उडवून मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे जायबंदी झालेल्या तब्बल ८५ पक्ष्यांवर मुंबईतील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी ११ पक्षी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. दरवर्षी पतंगाच्या मांजामध्ये अडकून पक्षी जायबंदी होतात. अशा जखमी पक्ष्यांना परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येते. मकर संक्रांतीच्या दिवशी पक्षी जखमी होण्याचे प्रमाण लक्षात घेता रुग्णालयाने शहराच्या विविध भागागमध्ये विशेष रुग्णवाहिका पाठविल्या होत्या. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून काही संस्थांनी मुंबईतील भायखळा आणि हाजीअली या भागामध्ये जखमी पक्ष्यांसाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा… मेट्रो २ अ मार्गिकेवरील एक्सर – मंडपेश्वरदरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प
रुग्णालयाने राबविलेल्या या उपक्रमांतर्गत मांजामुळे जखमी झालेल्या कबुतरांवर उपचार करण्यात आले. भायखळा व हाजीअली येथील शिबिरात सर्वाधिक कबुतरांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाने सामाजिक संस्थांच्या मदतीने आयोजित केलेली शिबिरे आणि शहरामध्ये विविध ठिकाणी पाठविलेल्या रुग्णवाहिकांमध्ये जखमी ७४ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. यामध्ये कबुतरांची संख्या अधिक होती. त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्या ११ पक्ष्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कबुतरांबरोबरच तीन ते चार घारींचाही समावेश असल्याची माहिती दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.
मांजामुळे काही पक्ष्यांचे पंख कापले गेले असून काही पक्षी मांजाला अडकून खाली पडून जखमी झाले. त्याचबरोबर मानेभोवती माजा गुंडाळल्याने, पाय कापल्याने पक्षी जखमी झाले आहेत.