गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रश्नी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत कामगारांनी आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ मार्च रोजी गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढणार आहेत. दीड लाख गिरणी कामगारांना कसे, कुठे आणि कधी घर देणार याबाबत राज्य सरकारने अजूनही कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही.
हजारो विजेते-गिरणी कामगार किंवा वारसदारांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. शेकडो विजेते कामगार गृहकर्जाचा समान मासिक हप्ता भरत आहेत. एकूणच राज्य सरकार आणि म्हाडा कामगारांच्या घरांच्या प्रश्नी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे. याच अनुषंगाने आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय सर्व श्रमिक संघटनांनी घेतला आहे.
हेही वाचा – गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी, हैद्राबादमधील व्यक्तीविरोधात गुन्हा
करीरोड येथे रविवारी झालेल्या बैठकीत संघटनेने १२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बी. के. आंब्रे यांनी दिली. संघटनेने १८ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर, वर्षावर मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन कोरडेच ठरले आहे. त्यामुळे, मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही आंब्रे यांनी सांगितले.