मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ (आरे) भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर आता अगदी काही दिवसातच बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा २ अ टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) आणखी एक पाऊल पुढे उचलले आहे. एमएमआरसीकडून शनिवारपासून आरे – बीकेसी आणि बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. या चाचण्यांसाठी आरे – बीकेसी मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रका बदल करण्यात आला आहे. रविवारी आणि सोमवारी सकाळी आणि रात्रीच्या सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. आता लवकरच अवघ्या काही दिवसांत बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळी दरम्यानचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनासाठीची सध्या सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षाचे (सीएमआरएस) पथक मुंबईत पाच दिवसांपूर्वी दाखल झाले असून त्यांच्याकडून टप्पा २ अ चे निरीक्षक सुरू आहे. २ अ टप्प्याअंतर्गत बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान थेट मेट्रो गाडी धावणार आहे. यासाठी आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक अशी एकत्रित चाचणी करणे आवश्यक आहे. अखेर या एकत्रित चाचण्यांना शनिवारी सुरुवात करण्यात आली. या एकत्रित चाचण्यांसाठी आरे – बीकेसीदरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती एमएमआरसीकडून ‘एक्स’ समाज माध्यमावरून देण्यात आली.

शनिवारपासून एकत्रित चाचण्या सुरू झाल्या असून शनिवारी सकाळी आरे – बीकेसीदरम्यानची मेट्रो सेवा सकाळी ६.३० वाजता नियमित वेळापत्रकानुसार सुरू झाली. मात्र शेवटची गाडी रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० वाजता सोडण्यात येणार आहे. एमएमआरसीने रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकातही मोठा बदल केला आहे.

रविवारी वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० वाजता (१३ एप्रिल) पहिली गाडी सुटणार आहे. मात्र शेवटची गाडी रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० वाजता सुटणार आहे. त्यामुळे रविवारी सेवा कालावधीत एक तासाची कपात होणार आहे. तर सोमवारी (१४ एप्रिल) सकाळी ६.३० ऐवजी सकाळी ७.३० वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. तर शेवटची गाडी रात्री १०.३० ऐवजी रात्री ९ वाजता सुटणार आहे.

एकूण सोमवारी सकाळी एक तासाचा सेवा कालावधी, तर रात्री दीड तासाचा सेवा कालावधी कमी करण्यात आला आहे. प्रवाशांनी ही माहिती तपासून मेट्रो ३ मार्गिकेवरून प्रवास करावा. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र टप्पा १ आणि टप्पा २ अ च्या एकत्रित चाचण्यांसाठी हा बदल करण्यात आल्याने ही बाब महत्त्वाची आहे. कारण एकत्रित चाचण्या सुरू झाल्याने टप्पा २ अ दृष्टीक्षेपात आला आहे. लवकरच मुंबईकरांना आरे – आचार्य अत्रे चौक, वरळी दरम्यान थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे.