मुंबई : राज्यात सोमवारी (१६ डिसेंबर) नगर, पुणे, मालेगाव, नाशिक, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर आणि आकोल्यात थंडीची लाट पसरली होती. नगर येथे सर्वांत कमी ५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपासून (१८ डिसेंबर) किमान – कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भातील काही ठिकाणी तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी थंडीची लाट पसरली होती. नगरमध्ये सर्वांत कमी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नगर खालोखाल पुण्यात ७.८, जळगावात ७.८, मालेगावात ९.६, मराठवाड्यातील धाराशिवमध्ये ९.४, छत्रपती औरंगाबादमध्ये ९.६, परभणीत ८.२, बीडमध्ये ७.५, विदर्भातील गोंदियात ७.४, नागपुरात ८.४, वर्ध्यात ९.४ आणि अकोल्यात ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. वरील बहुतेक ठिकाणी थंडीच्या लाटेची किंवा थंडीची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
लडाखमध्ये वजा १३.६ अंश सेल्सिअस
हिमालयीन रांगांसह उत्तर भारतात थंडीची लाट आहे. सोमवारी लडाखमध्ये वजा १३.६, शोपियान वजा ६.३, हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीत वजा ७.५, पंजाबमध्ये ०.६, हिस्सारमध्ये ०.६, दिल्लीत ४.० आणि अयोध्येत ३.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट सक्रीय आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाली आहे.
हेही वाचा…नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
े
नगरमध्ये १९७० च्या डिसेंबरची पुनरावृत्ती
नगरमध्ये २१ डिसेंबर २०१० मध्ये आजवरचे डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी ३.२ अशं सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. तर १ डिसेंबर १९७० रोजी ५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी नगरमध्ये १९७० मधील तापमानाची पुनरावृत्ती झाली आहे. नगरमध्ये ७ जानेवारी १९४५ रोजी आजवरचे सर्वांत कमी २.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
बुधवारपासून थंडी कमी होणार
उत्तर भारतात थंडीची लाट आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी राज्यापर्यंत पोहचत आहे. मंगळवारी (१७ डिसेंबर) पहाटे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात थंडीची लाट किंवा थंडीची लाट सदृश्य स्थिती असू शकेल. बुधवारपासून (१८ डिसेंबर) किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून राज्यातील थंडी कमी होईल, अशी माहिती मुंबईस्थित हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. सुषमा नायर यांनी दिली.