मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील तीन मेट्रो स्थानकांचे अखेर नामांतर करण्यात आले. रहिवाशांच्या मागणीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलली आहेत. त्यानुसार आता पहाडी गोरेगाव मेट्रो स्थानक बांगुर नगर मेट्रो स्थानक या नावाने ओळखले जाणार आहे.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवर जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागली आहे. या मार्गिकांना प्रवाशांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील काही मेट्रो स्थानकांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. पहाडी गोरेगाव, पहाडी एक्सर आणि वळनाई या तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर एमएमआरडीएने ही मागणी मान्य केली असून आता पहाडी गोरेगाव स्थानक बांगुर नगर मेट्रो स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. तर पहाडी एक्सर स्थानक आता शिंपोली मेट्रो स्थानक, तर वळनाई मेट्रो स्थानक वळनाई मीठ चौकी या नावाने ओळखले जाणार आहे.