मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ डिसेंबर अखेरीस सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने अखेर एमएमआरडीएने कामाला वेग दिला आहे.

मंडाले कारशेडमधील विद्याुतीकरणाचे काम पूर्ण झाले असून ८ एप्रिलपासून विद्याुत प्रवाहनास सुरुवात झाली. आता डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिकेवर पहिल्यांदाच मेट्रो गाडी धावणार आहे. बुधवारपासून (१६ एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो १(घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) आणि मेट्रो ३ (आरे ते बीकेसी) या मार्गिका सेवेत दाखल आहेत. तर येत्या काही दिवसातच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक मार्गिका ही सेवेत दाखल होणार आहे. तर आता डिसेंबरअखेरीस मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिका, टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे सुरु आहे.

एमएमआरडीएने पाच मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. मंडाले कारशेडमधील ८ एप्रिलला विद्याुत प्रवाहन सुरु झाल्याने आता मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार बुधवारी, १६ एप्रिलपासून मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

पाचवी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार

मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या संचालनाकरिता पुरेशा मेट्रो गाड्या मंडाले कारशेडमध्ये दाखल आहेत. आता या गाड्यांची चाचणी बुधवारी सुरु होणार असून पहिल्यांदाच मेट्रो गाडी डायमंड गार्डन ते मंडाले धावणार आहे. डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानुखुर्द आणि मंडाले अशा पाच स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यामुळे बुधवारी या पाच स्थानकांवरून मेट्रो गाडी धावणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

पाचवी मेट्रो मार्गिका

मेट्रो गाडी आणि विविध यंत्रणांची चाचणी यशस्वी झाल्यास, पहिल्या टप्प्यातील आणि कारशेडचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यास एमएमआरडीएकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. तर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर डायमंड गार्डन ते मंडाले या पहिल्या टप्प्याचे संचलन सुरू होईल. यास किमान सहा-सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने ‘एमएमआरडीए’कडून पहिल्या टप्प्याच्या संचलानासाठी डिसेंबर अखेरीसचा मुहुर्त दिला जात आहे. त्यामुळे मंडाले ते डायमंड गार्डन असा प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न डिसेंबअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास सेवेत दाखल होणारी ही मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका असेल.