मुंबई / ठाणे : घटस्थापनेनिमित्त मुंबईतील दादर आणि कल्याण फुलबाजारात सर्व फुलांच्या भावात दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे. मंगळवारी २० ते ३० रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू ५० ते ६० रुपयांवर पोहोचला. पूजेचे हार तयार करण्यासाठी लागणारा लाल कलकत्ता झेंडू ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

कल्याण बाजारात मंगळवारी मध्यरात्री फुलांची अधिक आवक होईल. सुमारे दीडशे गाड्या बाजारात दाखल होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. दादरसह ठिकठिकाणच्या फुल बाजारांमध्ये सुगंधी फुलांचा गंध दरवळू लागला असून केशरी रंगाच्या झेंडूचा साज चढला आहे. फुले, तोरणे, हार, आंब्याची डहाळी, विड्याची पाने खरेदी करण्यासाठी फुलबाजारात तुडुंब गर्दी झाली. त्यामुळे एरवी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने मिळणाऱ्या फुलांच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. बाजारात झेंडूव्यतिरिक्त रंगीबेरंगी गुलाब, चाफा, कण्हेरी, मोगरा, ऑर्किड आदी विविध फुलांनाही मोठी मागणी आहे.

हेही वाचा – आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट

तुकडा गुलाबाची विक्री १५० ते १२० रुपये किलोने केली जात आहे. उद्यापासून पुढील नऊ दिवस यात अधिक २० ते ३० रुपयांची वाढ होईल. मंगळवारी सकाळी कल्याणच्या फुलबाजारात ८० गाड्यांची आवक झाली. नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूची प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दराने विक्री होत आहे. तर, लाल, गुलाबी, पिवळ्या, सफेद रंगाच्या सहा गुलाबांची जुडी १०० रुपयांना मिळत आहे. मोगरा, कण्हेरी, गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गजरे आणि वेण्यांचे दर ५० ते १३० रुपये इतके आहेत. तसेच देवीला अर्पण करण्यात येणारे मोठे हार १०० ते २०० रुपयांना विकण्यात येत आहेत. तसेच, दसऱ्यापर्यंत फुले, गजरा, वेणी आणि हारांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून ठिकठिकाणच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीत मग्न आहेत. गरबा, दांडियाची तयारी सुरू आहे. उत्सवात त्रुटी राहू नये यासाठी कार्यकर्ते मंडळी झटत आहेत. दादरमधील फुलबाजारात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते.

हेही वाचा – राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! एमबीबीएसच्या ८०० जागा वाढल्या…

प्रसिद्ध दादर आणि कल्याण बाजारात नवरात्रोत्सवाला फुलांच्या किमतीत दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे. घटस्थापनेनंतर २० ते ३० रुपयांनी ही वाढ कायम राहील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

फुलांचे दर ( प्रति किलो )

पिवळा झेंडू – ५० ते ६० रुपये, लाल कलकत्ता झेंडू – ७० ते ८० रुपये, लाल झेंडू – ४० ते ५० रुपये, पांढरी शेवंती – २५० ते ३०० रुपये, गुलछडी – १०० रुपये, निशिगंधा – २०० रुपये, अष्टर – १५० रुपये, तुकडा गुलाब – १२० ते १५० रुपये

नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस फुलांचे दर २० ते ३० रुपयांनी किंवा त्याहून अधिक चढेच राहणार. मात्र फुलांचे दर अधिक जरी असले तरी ग्राहकांची गर्दीही मोठी आहे. – भाऊ नरोडे, फुलव्यापारी