अन्न सुरक्षा कायद्याला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी उघडपणे विरोध केला असला तरी या कायद्याचे श्रेय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पवार यांनाच दिल्याने हे सारे मतांसाठी की आबांचे अज्ञान याचीच चर्चा सुरू झाली.
अन्न सुरक्षा कायद्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल तसेच शेतकऱ्यांमध्ये जास्त आळस येऊन उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करीत शरद पवार यांनी विरोध दर्शविला होता. पवार यांनी जाहीरपणे या कायद्याला विरोध केला होता. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा कायदा प्रतिष्ठेचा केल्याने तो मंजूर करण्यासाठी यूपीए सरकारने पुढाकार घेतला. कायदा मंजूर करण्यास राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शविला असला तरी पवार यांचा आक्षेप अजूनही कायम आहे. पवार यांच्या ७३व्या वाढदिवसाचे निमित्त साधून नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आर. आर. पाटील यांनी अन्न सुरक्षा कायद्याचे सारे श्रेय पवारांना दिले. ज्या कायद्यास पवारांनी विरोध दर्शविला त्याचे श्रेय पवार यांच्या खंद्या निकटवर्तीयाने त्यांनाच द्यावे हे सारे मतांसाठी आहे की काय, अशी शंका येते. कारण २००९च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सारे श्रेय राष्ट्रवादीने पवार यांना दिले होते.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ७३ किलो वजनाचा केक कापण्यात आला. तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त जमलेले पक्षाचे सारेच मंत्री पवार यांच्या भेटीसाठी रात्री विशेष विमानाने नवी दिल्लीला गेले होते. वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज्य यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा