काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आदर्श गैरव्यवहार चौकशीच्या अहवालावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मारलेली चपराक अर्धीच बसल्यामुळे तो अंशत: स्वीकारण्यात आला असावा, असे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोडले.
दोषींवरील कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असून जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर जनतेच्या डोळ्यांत सरकारने धूळफेक केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना पूर्ण चपराक बसल्यावरच बहुधा संपूर्ण अहवाल स्वीकारला जाईल, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली. हा अहवाल अंशत: स्वीकारणे म्हणजे लोकशाहीची थट्टा असून मुख्यमंत्र्यांचे नाटक आहे. भ्रष्टाचारी व दोषींना वाचविण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप तावडे यांनी केला.
भ्रष्टाचाराच्या इमल्यावर उभी राहिलेली आदर्श इमारत तोडण्याची मागणी तावडे यांनी केली. आदर्श अहवाल मंत्रिमंडळात फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता, असे सांगणारी राष्ट्रवादी काँग्रेस दुटप्पी असल्याची टीकाही तावडे यांनी केली. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे, राजेश टोपे यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोप तावडे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवर दबाव
‘मिस्टर क्लीन’ या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा गेला असून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला. राहुल गांधींच्या सूचनेवरून फेरविचार झाला. आता सोनिया गांधी यांनी कोणाला वाचविण्याचे आदेश दिले, तर पुन्हा फेरविचार करणार का, असा सवाल खडसे यांनी
केला.  हा अहवाल अंशत: स्वीकारून सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका खडसे यांनी केली. भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना संरक्षण न देता दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असते, तर खऱ्या अर्थाने सरकारने फेरविचार केला असता हे दिसून आले असते, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader