मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १’मधून शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध केली. विद्यार्थ्यांनी सोमवारी मोठ्या संख्येने ‘मेट्रो १’मधून मोफत प्रवास केला. सकाळी ६.३० ते दुपारी ४ या वेळेत तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी ‘मेट्रो १’मधून सफर केल्याची केल्याची माहिती एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो १’ने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. ‘मेट्रो १’च्या मुख्यालयासह १२ मेट्रो स्थानकांवर ध्वजारोहण करण्यात आले. सर्व मेट्रो स्थानकांवर सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. त्याचवेळी स्वातंत्र्यदिनी संपूर्ण दिवस शालेय विद्यार्थ्यांना ‘मेट्रो १’मधून सफर करण्याची संधी उपलब्ध केली होती. सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासूनच सर्व मेट्रो स्थानकांवर शालेय गणवेशात विद्यार्थी दिसत होते. मोफत तिकीट घेऊन मेट्रो प्रवास करताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसत होता. यात अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच मेट्रोमधून प्रवास करीत होते. सकाळी ६.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो प्रवास करता आला. दुपारी चार वाजेपर्यंत १२०० विद्यार्थ्यांनी ‘मेट्रो १’ मधून सफर केली. त्यानंतरही मोठ्या संख्येने विद्यार्थी मेट्रो स्थानकावर दिसत होते.