बेस्ट प्रवाशांना दिवाळीत अवघ्या नऊ रुपयांमध्ये पाच फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाने डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी ही दिवाळी योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १२ ऑक्टोबरपासून सुरू होत असून प्रवाशांना ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशाला सात दिवसांमध्ये पाच फेऱ्यांमधून प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा >>>खोणी-शिरढोणची घरे १० टक्के स्वस्त ; बाळकुममधील घरे मात्र १६ लाखांनी महाग
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना बेस्ट चलो ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर ॲपवरील बस पासच्या पर्यायात ही योजना उपलब्ध होईल. ‘दिवाळी ऑफर’निवडून त्यावरील तपशील भरल्यानंतर डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंग, यूपीआयद्वारे नऊ रुपयांचा ऑनलाईन भरणा करावा लागेल, असे उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवास सुरू करण्यासाठी भ्रमणध्वनीमधील ‘फेरी सुरू करा’ असे बटण दाबा. प्रवास वैधतेसाठी तिकीट मशिनजवळ फोन टॅप करा. त्यानंतर प्रवास फेरीची पावती मिळेल. कोणत्याही बस मार्गांवर सात दिवसांच्या कालावधीत पाच प्रवासी फेऱ्या करू शकतात. ही योजना विमानतळ मार्ग, हॉप ऑन हॉप बस या विशेष बस सेवा वगळून सर्व वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बससाठी लागू असेल.