गेल्या काही वर्षांमध्ये गिरगाव परिसरात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले असून अनेक चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. मराठी टक्का आटला असला तरी आजही या भागात उत्सव संस्कृतीचे दर्शन घडत आहे. याच उत्सव संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन गिरगावला खेटून असलेल्या चिराबाजार परिसरातील एका युवकाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातच घडविले आहे. गिरगावात साजरी होणारी मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या दिंडीचे दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे अनेकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट केली आहे. अनेकांनी सामाजिक प्रश्नांवर आधारित देखावे साकारले आहे. काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. काही मंडळींनी अगदी छोट्या जागेत आकर्षक देखावे साकारून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. असाच एक देखावा गिरगावजवळच असलेल्या चिराबाजार परिसरातील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरील ४७९ कृष्णा बिल्डिंग, तिसरा मजला खोली क्रमांक ८ मध्ये साकारला आहे.

हेही वाचा : मुंबईत विसर्जन शांततेत ; वांद्रे, बाबुलनाथ चौक वगळता इतरत्र आवाजाची पातळी कमी

पारंपरिक पद्धतीने सण-उत्सव साजरे होण्याचे मुंबईतील एक ठिकाण म्हणजे गिरगाव. कुणे एकेकाळी हा परिसर अस्सल मराठमोळा भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र कौलाघात मराठी टक्का ओसरत गेला आणि हळूहळू मराठी संस्कृती लोप पावते की काय अशी भिती निर्माण झाली. मात्र या परिस्थितीतही उरल्यासुरल्या मराठी भाषकांनी आपले उत्सव पूर्वीप्रमाणेच उत्साहाने सुरू ठेवले आहेत. डिसेंबरची गुलाबी थंडी पडू लागताच गिरगावकर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मकरसंक्रांतीचे वेध लागायचे.

आकाशात भिरभिरणारे रंगेबीरंगी पतंग दृष्टीस पडायचे. हवेत भिरभिरणारे पतंग कापण्याची स्पर्धाच लागायची. मकरसंक्रांतीचा दिवस पतंग उडवून साजरा व्हायचा. अगदी अबालवृद्ध मंडळी, महिलाही या उत्सवात रंगून जायची. होळी, गुढीपाडवा, दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्रौत्सव असे एकामागून एक येणारे सण-उत्सव गिरगावात मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे. मुंबईमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत सुरू झाला. त्यानंतर हळूहळू गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत गेली. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेने मुंबईकरांची पसंती मिळविली. गिरगावच्या या उत्सव संस्कृतीचे दर्शन मन रेळे याने आपल्या चिराबाजारातील घरात घडविले आहे. आजी, आजोबा, आई, वडील आणि घरातील इतर सदस्यांच्या मदतीने मन याने घराच्या एका खोलीमध्ये निरनिराळ्या सण-उत्सवाचा देखावा साकारला आहे.

हेही वाचा : गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर

गणेशोत्सव, आनंद वारी, दिवाळी, मकरसंक्रांत आणि गुढी पाडव्याची शोभायात्रा आदींचा त्यात समावेश आहे. आकर्षक रंगसंगतीने देखावा लक्षवेधी ठरत आहे. या देखावा साकारण्यासाठी तब्बल दोन महिने लागले. या देखाव्यात गिरगावातील गिरगाव चर्चजवळील मोठा चौक साकारण्यात आला आहे. संपूर्ण सजावटीसाठी सनबोर्ड, कार्डपेपर, कापड, शाडू माती आदी पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्यात आला आहे, असे मन रेळेने सांगितले. गिरगावातील उत्सव संस्कृतीचे एकाच छताखाली दर्शन घडविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असेही तो म्हणाला.

Story img Loader