पालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर सभा घेऊ देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा नोंद करून घेतली.
अ‍ॅड्. इजाज नक्वी यांनी ठाकरे यांच्याविरुद्ध अवमान याचिका केली असून न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने त्याची पुन्हा नोंद करून घेतली. याचिकेवरील सुनावणीसाठी नक्वी वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
बुधवारच्या सुनावणीत नक्वी यांनी याचिका पुन्हा नोंदवून घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करीत केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय तसेच प्रसारण मंत्रालयाला जूनमध्ये याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. राज्याच्या महाधिवक्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध अवमान याचिका करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्यावर नक्वी यांनी याचिका केली.

Story img Loader