लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मित्रांसोबत कर्जतला सहलीसाठी जाण्यास निघालेल्या परळ येथील केईएम रुग्णालयातील डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणे भलतेच महाग पडले. सायबर भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्या खात्यातून सुमारे दीड लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार केईएम रुग्णालयात रहिवासी डॉक्टर आहे. रुग्णालयातील काम शनिवारी काम संपल्यानंतर त्यांनी मित्रासोबत कर्जतला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी गुरूकृपा हॉटेलमधून समोसे खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले. ऑनलाईनवर शोध घेतला असता त्यांना एका संकेतस्थळावर हॉटेलचा दूरध्वनी क्रमांक सापडला. डॉक्टरांनी त्या क्रमांकावर दूरध्वनी केला असता समोरच्या व्यक्तीने आपण हॉटेलमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी २५ प्लेट समोसे हवे असल्याचे त्या व्यक्तीला सांगितले. दीड हजार रुपये आगाऊ द्यावे आणि व्यवहाराची माहिती व्हॉट्स ॲपवर देण्यास त्याने सांगितले.

आणखी वाचा-मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

तक्रारदार डॉक्टरांनी तसे केल्यानंतर आरोपीने व्यवहार क्रमांक तपासावा लागेल. त्यासाठी गुगल पेवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले व २८८०७ हा क्रमांक रक्कम त्या रकान्यात टाकून ॲड नोट्स पर्याय निवडण्यास सांगितला. तक्रारदार डॉक्टरांनी तसे केल्यानंतर त्यांच्या खात्यातून २८ हजार ८०७ रुपये हस्तांतरित झाल्याचा संदेश त्यांना आला. त्यानंतर ती रक्कम परत मिळवण्यासाठी आरोपींनी डॉक्टरला विविध व्यवहार करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामधून सुमारे एक लाख ४० हजार रुपये हस्तांतरित झाले.

ऑनलाईन व्यवहार नको, मी हॉटेलवर येऊन बोलतो, असे डॉक्टरांनी सांगताच त्या व्यक्तीने दूरध्वनी ठेवला. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तात्काळ भोईवाडा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्यांची माहिती पोलिसांनी बँकेकडे मागितली आहे. त्याद्वारे पुढील तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and a half lakh rupees were withdrawn from the doctors bank account during online samosas order mumbai print news mrj