लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्यासह देशामध्ये कर्करोगाच्या संख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रामध्ये मागील १० वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दीडपटीने वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या १ लाख २१ हजार ७१७ कर्करोग रुग्ण असून, मागील १० वर्षांमध्ये राज्यामध्ये २३ हजार ९५८ रुग्णांनी वाढ झाली आहे.
बदलती जीवनशैली, बदलता आहार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मद्यपान, अयोग्य आहार, शारीरिक निष्क्रियता आणि प्रदूषण अशा अनेक महत्त्वाच्या कारणामुळे मागील काही वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यासह देशातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने पुढील दोन वर्षांमध्ये देशातील कर्करोग रुग्णांची संख्या १५.७ लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशामध्ये कर्करोग रुग्णांची संख्या १४ लाख ६१ हजार ४२७ इतकी आहे. देशात उत्तर प्रदेशमध्ये कर्करोग रुग्णांची संख्या सर्वाधिक २ लाख १० हजार ९५८ इतकी आहे. कर्करोग रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये कर्करोग रुग्णांची संख्या ९७ हजार ७५९ इतकी होती. १० वर्षांनंतर राज्यातील कर्करोग रुग्णांच्या संख्येत २३ हजार ९५८ इतकी वाढ होऊन रुग्ण संख्या १ लाख २१ हजार ७१७ इतकी झाली आहे. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्तन कर्करोग, मौखिक कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्राखालोखाल पश्चिम बंगालमध्ये १ लाख १३ हजार ५८१, बिहारमध्ये १ लाख ९ हजार २७४ तर तामिळनाडूमध्ये ९३ हजार ५३६ इतकी आहे.
आणखी वाचा-अंधेरी स्थानकावर तिकीट तपासनीस, सुरक्षा जवान तैनात
महाराष्ट्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक असल्याने मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, त्याचबरोबर महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये ३० ते ३५ टक्के रुग्णांना कर्करोग हा तंबाखूच्या सेवनाने होतो. ३५ ते ४० टक्के रुग्णांना कर्करोग हा वारंवार दूषित अन्नाचे सेवन, जंक फूड, शेतीसाठी वापरण्यात येणारे पेस्टिसाईड, वातावरण खराब करणारे रासायनिक घटक, नागरिकांमधील स्थूलपणा यामुळे होत असतो. तसेच ५ टक्के रुग्णांना कर्करोग होण्याचे कारण हे अनुवांशिक असते. अनुवांशिकतेमुळे होणार कर्करोग हा टाळता येणारा नसतो. पण लोक याकडे अधिक लक्ष देतात. याउलट तंबाखूजन्य पदार्थ आणि रासायनिक घटकांच्या वापरामुळे होणाऱ्या कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपल्याकडे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील कर्करोग तज्ञ व रेडिओथेरपी विभागप्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी सांगितले.
वाढते प्रदूषण, वाढता तणाव, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, वाढते मद्यपान, धूम्रपान यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे जंक फूडच्या सेवनाबरोबरच खाण्याच्या बदललेल्या सवयींमुळे नागरिकांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. स्थूलपणा हे एक कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या आयुर्मानामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिसून येत आहे. -डॉ. गिरीश राजाध्यक्ष, कर्करोग विभाग प्रमुख, नायर रुग्णालय
आणखी वाचा-भुजबळांसह मुलगा आणि पुतण्याविरूद्धची बेनामी संपत्तीची तक्रार उच्च न्यायालयाकडून रद्द
सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य
उत्तर प्रदेश- २१०९५८
महाराष्ट्र – १२१७१७
पश्चिम बंगाल – ११३५८१
बिहार- १०९२७४
तामिळनाडू- ९३५३६
१० वर्षांतील राज्यातील रुग्णसंख्या
२०१३ – ९७७५९
२०१४ – १००२७५
२०१५ – १०२८३१
२०१६ – १०५४०७
२०१७ – १०८०२३
२०१८ – ११०६९६
२०१९ – ११३३७४
२०२० – ११६१२१
२०२१ – ११८९०६
२०२२ – १२१७१७