मुंबई : १९८२ च्या संपानंतर पुन्हा सुरु होऊ न शकलेल्या गिरण्यांच्या जागा मालकांना विकसित करण्यास परवानगी देताना गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी आतापर्यंत फक्त १५ हजार गिरणी कामगारांना घरे मिळू शकली आहेत. अद्यापही या सर्व गिरण्यांमधील सुमारे दीड लाख गिरणी कामगार वा त्यांचे वारस घराच्या प्रतीक्षेत आहेत. भविष्यात घर मिळू शकणार आहे किंवा नाही, याचीही त्यांना शाश्वती राहिलेली नाही. मुंबईत फारच कमी घरे निर्माण होण्याची शक्यता असून गिरणी कामगारांना यापुढे मुंबईबाहेर तरी घरे मिळेल का हा एक प्रश्नच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंद पडलेल्या वा आजारी कापड गिरण्याच्या विक्री व विकासासंदर्भात नव्या विकास नियंत्रण नियमावली २०३४ मध्येही तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील ५८ गिरण्यांची मोकळी जागा आणि शिल्लक चटईक्षेत्रफळाचे वाटप महापालिका, म्हाडा आणि गिरणी मालक यांच्यात समसमान करण्यात आले आहे. म्हाडाला उपलब्ध होणाऱ्या एकूण भूखंडापैकी दोन तृतीयांश भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे आणि एक तृतीयाश घरे संक्रमण शिबिर अशी नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे. ५८ गिरण्यांपैकी ३२ खासगी, २५ राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या तर एक गिरणी राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीच्या आहेत. ५८ गिरण्यांपैकी ११ गिरण्यांमध्ये पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही. उर्वरित ४७ गिरण्यांपैकी दहा गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे. म्हाडाला सध्या ३३ गिरण्यांमधील १३.७८ हेक्टर भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा प्राप्त झाला आहे. उर्वरित चार गिरण्यांच्या भूखंडाचा वाटा म्हाडाला हस्तांतरित झालेला नाही. म्हाडाला प्राप्त झालेल्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या १५ हजार ८७० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.

म्हाडाने गिरणी कामगारांच्या नोंदणीसाठी राबविलेल्या मोहिमेनुसार, एक लाख ७४ हजार गिरणी कामगार वा त्यांच्या वारसांनी घरांसाठी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत उपलब्ध करून दिलेली १५ ते १६ हजार घरे आणि भविष्यात उपलब्ध होणारी घरे पाहता दीड लाख गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार आहेत. महापालिकेकडून म्हाडास मिळणाऱ्या भूखंडावर म्हाडामार्फत घरे बांधली जातात. त्यामुळे जोपर्यंत पालिकेमार्फत भूखंड उपलब्ध होत नाही तोपर्यंत म्हाडाला काहीही करता येत नाही, असे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. आणखी चार गिरण्यांतील म्हाडाचा वाटा पालिकेकडून उपलब्ध झाला की, त्यावर म्हाडाला आणकी काही हजार घरे बांधता येणार आहेत. मात्र त्यानंतर मुंबईत म्हाडाला गिरणी कामगारांसाठी भूखंड उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भविष्यात मुंबईबाहेर भूखंड घेऊन गिरणी कामगारांसाठी घरे बांधता येतील का, याची चाचपणीही म्हाडाकडून सुरु असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and half lakh mill workers still waiting for house only 15 thousand workers get house rmm