कुख्यात डॉन दाऊन इब्राहिम याच्या नावाने धमकावून एका ट्रॅव्हल एजंट कडून ६२ लाखांची खंडणी उकळणाऱ्यास पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. दाऊदच्या नावाने गेल्या सहा वर्षांंपासून तो खंडणी उकळत होता.
फिर्यादी मोहम्महद सोहिल गुलाम खान (३९) यांचा ट्रॅव्हल एजंसीचा व्यवसाय आहे. त्यांनी २००८ मध्ये एक मालमत्ता विकत घेतली होती. ही मालमत्ता दाऊद इब्राहिम याच्या जागेत असल्याचे सांगत याच भागातील सैय्यद परवेज मकबूल हुसेन याने खान यांच्याकडून खंडणी मागितली. थेट दाऊद याचेच नाव आल्याने खान यांनी खंडणी दिली होती. त्यांतर हुसेन वेळोवेळी खान यांच्याकडून दाऊदच्या नावाने खंडणी उकळत होता. आतापर्यंत त्याने खान यांच्याकडून ६२ लाखांची खंडणी उकळली आहे.
नंतरही आरोपी हुसेनचे खंडणी मागणे सुरू होते. शेवटी गुलाम खान यांनी नकार दिला. त्यानंतरही हुसेन याने खान यांच्या पत्नीला रस्त्यात गाठून बंदुकीचा धाक दाखवला होता. खंडणीची रक्कम नाही दिल्यास पत्नीचे अपहरण केले जाईल, अशी धमकीही दिली. यानंतर मात्र खानने पायधुनी पोलीस गाठून तक्रार दिली. पोलिसांनी हुसेन याला खंडणी, धमकी आणि विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. याप्रकरणी हुसेन याच्याविरोधात आणखीही तक्रारी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader