मुंबई : ‘छावा’ चित्रपटाची बनावट लिंक्स तयार करून त्या इंटरनेटवर अपलोड केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमधून एका व्यक्तीला अटक केली. त्याने मुव्हीजप्राईम डॉट एक्सवायझेड या होस्टिंगरमार्फत ‘छावा’ चित्रपटाची लिंक त्याने अपलोड केली होती. त्याचप्रमाणे अनेक नव्या चित्रपटाची लिंकही तो याच माध्यमातून अपलोड करीत असल्याचे उघडकीस आले.

ऑगस्ट एंटरटेनमेंट कंपनीने प्रदर्शित केलेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या बनावट लिंक्स तयार करून काही अज्ञात व्यक्तींनी इंटरनेटवर अपलोड केल्याची तक्रार ऑगस्ट एंटरटेनमेंट कंपनीचे सीईओ रजत राहुल हक्सर यांनी मुंबई सायबर पोलिसांकडे केली होती. यामध्ये त्यांनी या बनावट लिंक्स १४ फेब्रुवारी ते २० मार्च २०२५ दरम्यान इंटरनेटवर अपलोड केल्याचे तक्रारी म्हटले आहे.

मुंबई सायबर पोलिसांनी याचा तपास केला असता ‘छावा’ चित्रपटाची बनविण्यात आलेली बनावट लिंक्स तयार करण्यासाठी मुव्हीजप्राईम डॉट एक्सवायझेड या डोमेनचा वापर केल्याचे आढळून आले. तसेच ही लिकं नाशिकमधील मुंबई नाका येथील दत्ता मेट्रिक कंपनी कॉलनी येथे राहणाऱ्या विवेक धुमाळ (२६) याच्याकडे सापडली. त्यामुळे मुंबई दक्षिण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक देसले आणि पोलीस शिपाई लहारे यांनी यांनी ११ एप्रिल रोजी त्याला नाशिक येथून अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये त्याने ‘छावा’ चित्रपट अपलोड करण्यासाठी होस्टिंगरकडून मुव्हीजप्राईम डॉट एक्सवायझेड हे डोमेन खरेदी केले होते. तसेच तो ‘छावा’ आणि इतर नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे स्ट्रीमिंग करीत असल्याचेही आढळून आले. आरोपीला शनिवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले.