लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मानवी तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून महिलेची पावणेसहा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरूणाला अटक करण्यात दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांना यश आले आले. आरोपीने सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाते उपलब्ध करून दिले होते. त्या बँक खात्यात फसवणूकीतील रक्कम आल्याचा आरोप आहे.

जाहाद जैउल्ल्हा खान (२१) असे अटक आरोपीचे नाव असून तो मिरा रोड पूर्व येथील रहिवासी आहे. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३५ (३), ३४० (२), ६१ (१), २०४ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) व ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार महिलेला २३ सप्टेंबर २०२४ रोजी तोतया पोलिसाचा दूरधवनी आला होता. तोतया अधिकाऱ्याने आपले नाव सावंत असल्याचे सांगितले. त्यांच्या आधारकार्डचा वापर करून सीमाकार्ड खरेदी केले असून त्याचा वापर मानवी तस्करीसाठी करण्यात आल्याचे त्याने तक्रारदार महिलेला सांगितले. सीमकार्डद्वारे आर्थिक गैरव्यवहारही करण्यात आल्याचे त्याने तक्रारदार महिलेला सांगितले. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांमधून अलोक व मिश्रा नावाने तक्रारदार महिलेला व्हिडिओ कॉल करण्यात आले.

भारतीय नागरिकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आली असून ही रक्कम खासगी बँकेच्या खात्यात जमा झाली. ते खाते तक्रारदारांच्या आधारकार्डाद्वारे उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांना ऑनलाईन लिंक पाठवण्यात आली. त्यात त्यांच्या नावाचा वॉरंट व मालमत्ता जप्तीचे आदेश होते. त्यामुळे तक्रारदार महिला घाबरल्या. अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेला अटकेची भीती घातली आणि अटक टाळण्यासाठी गैरव्यवहाराच्या रकमेतील सुरक्षा ठेव म्हणून बँक खात्यात पाच कोटी ८८ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार महिलेने आरटीजीएसद्वारे पाच कोटी ८८ लाख ८६ हजार ९५७ रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यात जमा केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बँक व्यवहारांच्या मदतीने तपास केला असता त्यातील पाच लाख रुपये आरोपी खानच्या बँक खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. ती रक्कम काढण्यातही खानचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर अखेर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्यांत त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.