लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जावेद आझम या ४८ वर्षीय व्यावसायिकाला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. जावेदने याप्रकरणातील अटक आरोपी उन्ननाथन अरूणाचलम याच्या मार्फत १८ कोटी रुपये स्वीकारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जावेद आझम(४८) हा कांदिवली येथील रहिवासी आहे. तो इलेक्ट्रीक वस्तू वितरणाचा व्यवसाय करतो. यापूर्वी अटक आरोपी अरूणाचलम हा देखील इलेक्ट्रीक वस्तू विक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळे तो जावेदच्या संपर्कात आला होता. मनोहर अरुणाचलम व उन्ननाथ अरूणाचलम या पिता-पुत्राने या गैरव्यवहारातील एकूण ३३ कोटी घेतले. मेहताने २०१९ मध्ये मनोहरला १५ कोटी दिले. त्यानंतर १८ कोटी रुपये त्याच्या कार्यालयात स्वीकारल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हे १८ कोटी रुपये उन्ननाथ अरूणाचलमने आरोपी जावेदला दिले होते.
या गैरव्यवहारातील काही रक्कम मुख्य आरोपी हितेश मेहताने घर खरेदीसाठी घेतली होती. याशिवाय अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने बांधकाम व्यावसायिक धर्मेल पौनला दिल्याचा संशय आहे. गैरव्यवहार सुरू असतानाही त्याच्याकडे काणाडोळा करणारे बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तसेच या प्रकरणातील तत्कालीन अध्यक्ष हिरेन भानू यांना २६ कोटी व त्यांची पत्नी गौरी भानू यांना दोन कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे.
हिरेन, गौरीविरोधात लुकआऊट नोटीस
याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली.
याशिवाय याप्रकरणात बँकेचा तत्कालीन सीईओ अभिमन्यू भोअन याला अटक करण्यात आली. नुकतीच याप्रकरणी चौथा आरोपी मनोहर अरूणाचलम, कपिल देढिया व उन्ननाथन अरूणाचलम यांना अटक करण्यात आली. याशिवाय याप्रकरणातील हिरेन भानू, गौरी भानू सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.
मेहताच्या लायडिटेक्टरमध्ये काय उघड झाले
मुख्य आरोपी व बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याची सुमारे अडीच तास लायडिटेक्टर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून आरोपीने चौकशीत खोटी माहिती दिल्याचे लायडिटेक्टर चाचणीत उघड झाले. त्यामुळे पोलीस आता मेहताने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याने इतर आरोपींसह कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पण मेहता याबाबत कोणतेही सहकार्य करत नव्हता. अखेर याप्रकरणी मेहताची गेल्या आठवड्या मंगळवारी पॉलिग्राफ (लायडिटेक्टर) चाचणी करण्यात आली. त्यात ४० ते ५० प्रश्न आरोपी मेहताना विचारण्यात आले. सुमारे अडीच तास ही पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली.. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने तुरुंगातून मेहताला न्यायावैद्यक प्रयोगशाळेत नेले होते.