पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या प्रांगणात मारहाण केल्याप्रकरणी आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी दोन्ही आमदार स्वतःहून पोलिसांपुढे शरण आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही पूर्ण केली. पोलिसांनी दोन्ही आमदारांना दुपारी न्यायालयात हजर केले. राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना आजची रात्र पोलीस कोठडीत काढावी लागणार असून उद्या पुन्हा त्यांना न्यायलयात हजर केले जाणार आहे.
यासंदर्भात दोन्ही आमदारांच्या वकीलांनी न्यायालयाचा निर्णय मान्य केला असून उद्या त्यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असं ते म्हणाले.  
सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मंगळवारी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर सरकारी अधिकाऱ्याला मारहाण, बेकायदा जमाव करणे, जीवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४३, ३४१, ३५३, ५०४, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One day jail for ram kadam and kshitij thakur