– अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक दोन दिवसांची करण्याची मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक शनिवार, २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प जाहीर करण्यासह विद्यार्थी व शिक्षकांसंबंधित विविध प्रश्न, नवीन प्रकल्प व उपक्रम, विशेष तरतुदी आदी विविध गोष्टींवर सविस्तर चर्चा केली जाते. मात्र यंदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी कुलपतींकडून बैठकीसाठी दोनऐवजी एक दिवसांची परवानगी घेण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक एक दिवसांची होणार असल्यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना बगल मिळण्यासह विविध तरतुदींवरील चर्चा अर्धवट राहणार आहे, त्यामुळे काही विद्यार्थी तसेच शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत ही बैठक दोन दिवसांची करण्याची मागणी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक दोन वर्षांच्या विलंबाने झाल्यामुळे अधिसभा सदस्यांच्या कामाचा कालावधी दोन वर्षे कमी झाला आहे. या निवडणूक विलंबामुळे गेली दोन वर्षे अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा सदस्यांविनाच झालीच होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चाच झाली नाही. तसेच या बैठकीत दोन वर्षांनी नोंदणीकृत पदवीधर गटाचे अधिसभा सदस्य सहभागी होत आहेत.
मात्र या बैठकीच्या विषयपत्रिकेतून नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा सदस्यांचेच प्रश्न वगळण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवा सेनेने केला आहे. तसेच विद्यापीठाचा वार्षिक जमाखर्च, वार्षिक कार्यअहवाल, नवीन प्रकल्प आदी सर्व गोष्टींवर एका दिवसांत चर्चा होणे अशक्य असून विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न प्रलंबितच राहणार आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक बैठक एक दिवसांची घेण्यात येत असल्याचा आरोप बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनने (बुकटु) केला आहे.
या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून सदर दोन्ही संघटनांनी बुधवार, १९ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभापूर्व सदिच्छा बैठक म्हणजेच ‘चहापानावर’ बहिष्कारही घातला. सध्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत ‘बुक्टु’ संघटनेचे ८ (शिक्षक गट) आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेचे १० पैकी १० सदस्य आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत या दोन्ही संघटना विविध मुद्द्यांवरून विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्याची दाट शक्यता आहे.
वेळेअभावी विषय समजून घेणे अवघड
‘मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत अर्थसंकल्पातील विविध तरतुदींबाबत सविस्तर समजून घेण्याबरोबरच विविध मुद्दे उपस्थित करीत प्रश्न विचारायचे असतात. एका तरतुदीवर १० ते १५ मिनिटे चर्चा होते, या अनुषंगाने एका दिवसांत जवळपास ५० ते ६० तरतुदींवर चर्चा होऊन त्या समजून घेणे अवघड आहे. एका दिवसांची अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक म्हणजे प्रथेनुसार घेतलेला फक्त एक कार्यक्रम ठरेल, त्यामुळे ही बैठक दोन दिवसांची होणे अत्यंत आवश्यक आहे’, असे मत बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनचे (बुक्टु) सरचिटणीस आणि शिक्षक गटातील अधिसभा सदस्य चंद्रशेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कुलगुरूंना पत्र
‘विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक दिवसांची अर्थसंकल्पीय अधिसभेची बैठक पुरेशी नाही. त्यामुळे ही बैठक दोन दिवस होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पारदर्शकता येण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिसभा बैठकीचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह प्रक्षेपण) व्हावे. यासंदर्भात कुलगुरूंना पत्रही दिले आहे’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.