मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू; झाडाच्या मुळापर्यंत सीमेंट-काँक्रिटीकरण

मालाडच्या सुंदर नगर येथील दालमिया महाविद्यालयाजवळ दोन खासगी वाहने व एका रिक्षावर सकाळी झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. कोसळलेले झाड मुळापासून उखडले गेले होते. या झाडाच्या मुळापर्यंत सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच हे झाड मुळापासून उखडले असावे, अशी तक्रार स्थानिक करीत आहेत. काँक्रिटीकरणामुळेच या व्यक्तीचा बळी गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या अपघातात पराग अरुण पावसकर (वय ४५) यांचा मृत्यू झाला. पराग पावसकर हे आपल्या मुलीला दालमिया महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय’ या शाळेत सोडण्याकरिता आले होते. मुलीला शाळेत सोडून परत जात असताना त्यांच्या वाहनावर आणि आणखी एक खासगी वाहन व रिक्षावर झाड कोसळले.

हे अवाढव्य झाड हटविणे शक्य नव्हते. म्हणून क्रेनच्या साहाय्याने हलविण्यात आले. इतर दोन वाहनात अडकलेल्या वाहन चालक आणि दोन मुलांना सुखरुप बाहेर काढता आले. मात्र पराग पावसकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरीवलीतील भगवती रुग्णालयात नेण्यात आला. झाडाचा काही भाग बाजूच्या दुर्गा मंदीरावर आणि इमारतीवर पडल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.

इतर झाडांनाही धोका

या मार्गावरील पदपथावर असलेल्या झाडांच्या मुळांच्या सभोवतालचा काही भाग मोकळा न ठेवताच सिमेंट-काँक्रिटचे पदपथ आणि रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे झाडांची मुळे जमिनीत तग धरत नाहीत, असा स्थानिकांचा आरोप आहे. या भागात अनेक जुनी झाडे आहेत. त्यांच्यावरही भविष्यात ही आफत येऊ शकते, म्हणून येथील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. या रस्त्यावर शाळा आणि महाविद्यालय असल्याने दिवसभर मुलांची ये-जा असते. त्यामुळे, ही जीर्ण झाडे तोडली आणि त्या ठिकाणी नवीन झाडे लावली जावीत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.