मरिन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयात एका १४ वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. डेंग्यूमुळे झालेला हा शहरातील पहिला मृत्यू आहे.
वरळी येथे राहणाऱ्या ओमकार राजे याला तापावर उपचार करण्यासाठी जुलैमध्ये केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तीन दिवस राहिल्यावर त्याला घरी पाठवण्यात आले. मात्र काही दिवसात त्याला अपस्माराचे झटके येऊ लागले. त्यामुळे १९ जुलै रोजी त्याला बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आले. अपस्माराचे झटके आल्यावर त्याच्या पायातील संवेदना गेली. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्याची तब्येत बिघडली आणि मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
या मोसमात डेंग्यूचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या महिन्यात आतापर्यंत सहा रुग्णांना डेंग्यू झाला आहे. जूनपासून आतापर्यंत डेंग्यूचे ६६ रुग्ण शहरात आढळले आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसात कॉलराच्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी पोटदुखीमुळे पालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या २८१४ वर पोहोचली आहे. ताप, मलेरिया आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्याचप्रमाणे या आठवडय़ात स्वाइन फ्लूचा एक रुग्णही आढळला आहे.

Story img Loader