लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : एल्फिन्स्टन पुलावर बुधवारी दुचाकी घसरल्यामुळे ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जिगर दिलीप गाला असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्यांचे वडिल दिलीप गाला आणि नातेवाईक भाविन शाह यांच्याकडून पोलिसांनी घटनेबाबतची माहिती घेतली आहे.

प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलावरील व्ही.एस. मार्ग परिसरातील भीकू इमारतीजवळ हा अपघात झाला. दिलीप गाला प्रभादेवी येथे कुटुंबियांसोबत राहतात. गाला यांचे वह्या-पुस्तक विक्रीचे दुकान आहे. दिलीप गाला यांचा नातेवाईक भाविन याच्यासोबत त्यांचा मुलगा जिगर दुचाकीवरून बुधवारी प्रभादेवी येथून परळला कामासाठी जात होता. एन्फिन्स्टन पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी दुचाकी भाविन चालवत होता आणि जिगर त्याच्या मागे बसला होता. पुलावर जात असताना त्यांनी दुचाकीर घसरली. त्यामुळे मागे बसलेला जिगर गाला गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले.

तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती खालावत गेली. अखेर तीन तासांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. जिगरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. याप्रकरणी सुरूवातीला ईपीआर दाखल करण्यात आला होता. तसेच त्याबाबतची माहिती स्थानिक दादर पोलिसांना देण्यात आली. जिगरच्या मृत्यूनंतर याप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी जिगरचे वडील दिलीप गाला आणि चुलत भाऊ भाविन गाला यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात दुचाकी घसरून अपघात झाल्याचे सांगितले आहे. तसेच कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी केवळ अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

यापूर्वीही अपघात

दोन आठवड्यांपूर्वी एल्फिन्स्टन पुलावर गंभीर अपघात झाला होता. त्यात मोटरगाडीने टॅक्सीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये फुल विक्री करणारी महिला व टॅक्सीचालकाचा समावेश होता. हा अपघात एवढी भयंकर होता की टॅक्सीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुसरीकडे मोटरगाडीच्या एअरबॅग उघडल्यामुळे चालकाला गंभीर दुखापत झाली नव्हती.