मुंबई: भायखळा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी कंत्राटदार कंपनीचे दोन मालक, अभियंता व मजूर पुरवठादार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेल्या मजुराला आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच पर्यवेक्षक, अभियंता आणि सुरक्षा अधिकारीही घटनास्थळी उपस्थित नव्हते. आपल्या कृत्यामुळे कोणाचा तरी मृत्यू होऊ शकतो, हे त्या सर्वांना माहीत होते. तरीही निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भायखळा (पश्चिम) येथील कालापानी जंक्शन येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरून रविवारी सायंकाळी शकूर कामराज शेख हा मजूर पडला. त्याला तातडीने नायर रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा >>> धक्कादायक! मुंबईत २५ वर्षीय एअरहोस्टेसची गळा चिरून हत्या, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिस उपनिरीक्षक मुकेश शिरसाठ यांनी घटनास्थळ गाठून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. शिरसाठ यांनी शेख याच्या सहकार्‍याचे जबाब नोंदवले असून, शेख हा विसाव्या मजल्यावर काम करत होता. विटा देताना तो खाली पडला. त्याला  कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नव्हती, असेही साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. शेख हा नोंदणीकृत कामगारही नव्हता आणि त्यांच्या कंपनीने त्याच्या नावावर कोणताही विमा काढला नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय काम सुरू असताना घटनास्थळी पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित नव्हते. याप्रकरणी कंपनीच्या कंत्राटदाराचा जबाब नोंदवला असता त्यांच्या कंपनीने हार्नेस, सेफ्टी बेल्ट आणि सेफ्टी हेल्मेट दिले होते, परंतु शेखने ते घातले नाही, असे सांगितले आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dies from 20th floor of building a case has been registered mumbai print news ysh