लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर किमी ६.००० येथे पुणे – मुंबई (मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.
आणखी वाचा-कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल
पर्यायी मार्ग असे…
- यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना मुंबई – पुणे मार्गावरून जाता येईल.
- यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झीट किमी ३९.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
- यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट किमी ३२.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
- यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने पनवेल क्र. ४८ या मार्गावरून पनवेल मार्ग मुंबई दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
- मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे येथून मुंबईला जाणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.