प्रवाशांची तोबा गर्दी आणि त्यातच दुसऱ्या लोकलमधून अचानक कोणीतरी फेकलेला गुलाल डोळ्यांत गेल्यामुळे तोल जाऊन लोकलच्या दरवाज्यात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले. या अपघातात त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले. तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी असाच अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  
कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती लोकलने दादर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर शीवनंतर आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधून अचानक कुणीतरी गुलाल फेकला. तो कल्याणकडे जाणाऱ्या गाडीच्या दरवाजामध्ये उभे असणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्यात गेला आणि त्यामुळे हे प्रवाशी लोकलमधून पडल्याचे मध्ये रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.
 जखमींना शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात तसेच कुल्र्यातील भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचे नाव नित्यानंद (३०) असे असून, दीपक (३०), श्रीनिवास (३०) हे दोघे गंभीर जखमी आहेत. अखिलेश गुप्ता (२४), सुशांत भोईर (२०), लक्ष्मण त्रिंबके (२२), दिनेश मोरे आणि कविता परमार (चेंबूूर) यांची प्रकृती स्थिर आहे.

Story img Loader